27 May 2020

News Flash

जळगावात तीन करोना संशयित महिलांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील सर्वच करोना संशयितांचे तपासणी अहवाल नकारात्मक

संग्रहित छायाचित्र

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी सायंकाळी करोना संशयित दोन महिलांसह बालिकेचा मृत्यू झाला. या तिघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे कारण निश्चित होईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. दुसरीकडे आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील सर्वच करोना संशयितांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत.

जळगावमध्ये एक ६३ वर्षांची महिला कर्करोगाने आजारी होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तिचा सोमवारी मृत्यू झाला. तसेच एका बालिकेला तीन दिवसांपासून त्रास होत असल्याने घरच्यांनी सकाळी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांनाच तिचा मृत्यू झाला. तसेच एका ६० वर्षांच्या महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. तीनही रूग्णांचे मृत्यू वेगवेगळ्या परिस्थितीत झाले आहेत. तरीही करोना संशयित म्हणून त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले असून त्यांचा तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे निश्चित करता येत नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी दिली

दरम्यान, धुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. एकूण तीन हजार २६५ रुग्णांची तपासणी, तर तीन हजार २६४ जणांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत एक हजार १०६ जणांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. सर्वाँनी टाळेबंदीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्तार यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी आपण वेळोवेळी संपर्क साधत आहोत. करोनाविरोधात जिल्हा प्रशासन एकजुटीने काम करीत आहे.  धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच एम.आर.आय. यंत्र उपलब्ध होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. करोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक औषधे, मास्क, हातमोजे तसेच आरोग्याशी संबंधित इतर साधनसामग्री खरेदीसाठी यापूर्वीच रुपये चार कोटी रूपयांचा निधी देण्यात आलेला आहे. मनपा हिरे महाविद्यालयात वेगळा १६० खाटांचा विलगीकरण कक्ष व्हेंटिलेटरसह तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात मनपा हद्दीत सात आणि ग्रामीण भागात आठ अशा एकूण १५ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू  करण्यात आली आहेत.

जिल्ह्य़ात किराणा, भाजीपाला, दूध, चिकन, मटण, फळे यांची दुकाने उघडी आहेत. करोनासंबंधी कोणाला काही संशय, शंका असेल तर मनपा हेल्पलाईन क्रमांक ०२५६२-२८८३२० वर संपर्क करा. शासनाचा टोल फ्री क्रमांक १०४ वरही संपर्क साधता येऊ शकेल. करोनाला हरविण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही सत्तार यांनी केले आहे.

धुळ्यातील सर्वच अहवाल नकारात्मक

धुळ्यातील ‘त्या’ पोलिसांची चाचणी नकारात्मक

हरियाणातील झिकराहून वाहनाने शासकीय परवानगी घेत निलंग्यापर्यंत प्रवास करणारे १२ पैकी आठ प्रवासी करोना संक्रमित आढळले आहेत. त्यांचा ३१ मार्चला महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या धुळे जिल्ह्यातील हाडाखेड तपासणी नाकामार्गे प्रवास झाला आहे. शिवाय, निजामुद्दीनच्या कार्यक्रमास उपस्थित हैद्राबाद, दिल्ली येथील अनेक तबलिगींचा यामार्गे प्रवास झाला आहे. यावेळी तपासणी नाक्यावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक, एका महिला पोलिसासह सहा कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यामुळे या सहा पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात झाली. त्या सर्वाचे अहवाल नकारात्मक आल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. करोनाचे संक्रमण वेगात सुरू असताना या परिस्थितीत पोलीस अधिकारी-कर्मचारी विविध तपासणी नाके, चौकांसह गर्दीच्या ठिकाणांवर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यांचीही सुरक्षा महत्वाची असल्याने अशा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले.

धुळे बाजार समितीचे कामकाज सुरू

करोनामुळे बंद करण्यात आलेले धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज मंगळवारपासून सुरु करण्यात आले आहे. गर्दी होवू नये म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यासाठी टोकन पध्दतीचा वापर करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी बाजार समितीत पाच हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. १६५० ते २०५० रूपयांपर्यंत गव्हाला भाव मिळाला. १५० वाहनांना टोकन पध्दतीने बाजार समितीत प्रवेश करण्याची परवागी देण्यात आली. जिवनाश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होवू नये म्हणून बाजार समित्यांचे कामकाज सुरु करण्यात आले. समितीत येणाऱ्यांकडून सुचनांचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचे आढळून आले. समितीकडून प्रत्येकाचे ‘थर्मल टेंपरेचर स्क्रिनिंग’ करणे आवश्यक होते. तशी कोणतीही सुविधा नव्हती. प्रवेशव्दाराजवळ हात निर्जतुकीकरणासाठी पाणी, हॅण्डवॉश अथवा साबण ठेवण्यात आले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:17 am

Web Title: three corona suspected women die in jalgaon abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सांगलीत १३४ जणांची चाचणी नकारात्मक
2 टाळेबंदीत पोलीसांच्या गाडीतच ओली पार्टी; पोलिसासह तिघावर गुन्हा
3 निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु
Just Now!
X