आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांच्या घरी भ्रष्टाचार विरोधी पथकाला तीन कोटींची रोख रक्कम सापडली आहे. कालच त्यांना ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यांच्या इतर मालमत्ताबद्दल आता चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

राठोड यांच्यासह इतर दोघांनाही भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच घेताना पकडलं आहे. ह्यापैकी एका आरोपीचं नाव अरविंद तिवारी असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीने सांगितलं की त्याला आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी राठोड यांची परवानगी हवी होती. त्यावेळी राठोड यांनी फिर्यादीला तिवारी यांना भेटण्यास सांगितलं होतं. तिवारीने फिर्यादीला ५० लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर फिर्यादीने याबद्दलची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली.

त्यानंतर पथकाने ट्रॅप लावत ५० हजारांची लाच घेणाऱ्या तिवारीला पकडलं. यानंतर पथकाने तिवारीला पैसे घेऊन राठोडकडे पाठवलं. तेव्हा राठोडने ही रक्कम स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यावरुन हे लक्षात आलं की तिवारीने राठोडच्या सांगण्यावरुन लाच स्वीकारली होती. त्यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने राठोड यांना ताब्यात घेतलं.

या प्रकरणाच्या अनुषंगाने भ्रष्टाचार विरोधी पथकाने या दोघांच्याही घराची झडती घेतली. त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी पथकाला त्याच्या घरातून तीन कोटी ४६ लाख दहा हजारांची बेहिशेबी रोख रक्कम सापडली आहे. ती ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे.