तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शहरासह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांत तालुक्यात १०५ मिमी पाऊस बरसला. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असले, तरी तालुक्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट कायम आहे.
मागील ३ वर्षांपासून परंडा तालुक्यात दुष्काळाची छाया आहे. अपुऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सलग तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्यांचा काळ लोटला, तरीही तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. सीना-कोळेगाव, चांदणी, खासापुरी या महत्त्वाच्या धरणांसोबत इतर जलस्रोत कोरडेच आहेत. परिणामी बलपोळ्याचा सण महागाई, दुष्काळाच्या सावटाखालीच साजरा झाला.
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपासह रब्बी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकरी बिकट आर्थिक अडचणीत सापडला. तशातच यंदा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या बळिराजाला निसर्गाने पुन्हा चकविले. पावसाळ्यातील ३ महिने सरत आले असताना, अजून सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात पडला नाही. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर बनू शकेल, याची कल्पनाच करवत नाही. तीन दिवसांच्या पावसामुळे खरिपातील माना टाकत असलेल्या पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याचा प्रश्न मात्र मिटू शकलेला नाही.
परंडा तालुक्याची वार्षकि सरासरी ६१४ मिमी आहे. तालुक्यात सोमवापर्यंत केवळ २३६.४ मिमी एवढा अत्यल्प पाऊस झाला. परंडा मंडळात १९७, आनाळा ३२३, जवळा १८६, सोनारी १८९ तर आसू मंडळात केवळ १८६ मिमी पावसाची नोंद प्रशासनाकडे आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खासापुरी, चांदणी आदी धरणे कोरडीच आहेत.
जोरदार पावसाची परभणीत प्रतीक्षाच
वार्ताहर, परभणी
श्रावण महिना संपता संपता पावसाने जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले. काही भागात मात्र पिकांना या पावसाचा फायदा झाला नाही. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, या साठी का होईना जोरदार पावसाची अपेक्षा कायम आहे. सोमवारी एकाच दिवशी तब्बल २२.१२ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात आजवर १८५.९२ मिमी पाऊस झाला. गतवर्षीच्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे.
गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून हुलकावणी देत असलेला पाऊस श्रावणात तरी बरसेल, अशी अपेक्षा कालपर्यंत फोल ठरली होती. सोमवारी पोळ्याच्या दिवशी श्रावण महिन्याचा शेवट होता आणि या दिवशीच पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपापर्यंत कडक ऊन पडले होते. उकाडय़ातही प्रचंड वाढ झाली होती. सायंकाळच्या वेळी वातावरण एकदम बदलले आणि काही वेळातच आकाशात काळे ढग जमा होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात तासभराहून अधिक वेळ पावसाच्या सरी बरसत होत्या. काही ठिकाणी अर्धा तास पाऊस झाला. परंतु या पावसात चांगला जोर होता. यंदाच्या वर्षांतला हाच सर्वात मोठा पाऊस आतापर्यत ठरला. एरवी रिमझिमवरच समाधान मानणारा पाऊस सोमवारी मात्र दमदार बरसला.
जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५६.३३ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी ठिकठिकाणच्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये – परभणी १८.९०, पालम १४, पूर्णा ३२.६०, गंगाखेड ११, सोनपेठ १०, सेलू १५.६०, पाथरी २५, जिंतूर ५६.३३, मानवत १५.६७. रात्रभर एकूण २२.१२ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २३० मिमी पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी पाऊस पालम तालुक्यात झाला.