जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी ‘यशदा’च्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमस्थळी केवळ एका सदस्याची उपस्थिती होती. इतरांनी पाठ फिरवल्याने हे प्रशिक्षणच रद्द करण्याची नामुष्की प्रशासकीय यंत्रणेवर ओढावली. पहिल्या टप्प्यात काही सदस्यांनी या प्रशिक्षणवर्गाला भेट दिली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात तीन दिवसांचे प्रशिक्षण व नामांकित व्याख्याते असूनही कोणीच फिरकले नाही.
 बीड जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मिळावी, यासाठी यशदा संस्थेच्या वतीने प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेहोते. दोन महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात घेतलेल्या प्रशिक्षणवर्गाला काही सदस्यांनी भेट दिली होती. प्रशासकीय यंत्रणेने वेळ मारून नेली, तेव्हा कुठे हा टप्पा पूर्ण झाला. मात्र दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राहिलेल्या सदस्यांसाठी १८ ते २० जुलै या कालावधीत हॉटेल अन्विता येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. विविध सत्रात अभ्यासकांचे व्याख्यान आणि चर्चासत्र आयोजित केले होते. सदस्यांसाठी हॉटेलमध्ये निवासाचीही सोय होती. मात्र साठपैकी एका सदस्याने हजेरी लावली. अध्र्या तासाचा उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने अनेक सदस्यांशी संपर्क करून पाहिला, मात्र कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर तीन दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावली.