वणी तालुक्यातील डोर्ली येथे गुरुवारी सायंकाळी पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह शुक्रवारी गावापासून एक किलोमीटर अंतरावर आढळले. हरिदास खाडे (५२) व विनायक उपरे (५१) अशी मृतांची नावे आहेत, तर मीना कुडमेथे (३५) या महिलेचा मृतदेह बचाव पथकास गुरुवारीच सापडला होता.

डोर्ली येथील मीना कुडमेथे, मनीषा सिडाम, हरिदास खाडे, विनायक उपरे, मीना सिडाम हे पाच जण तीन बैलबंडीने शेतातून घरी परत येत होते. परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने गावालगतच्या नाल्यास पूर आला होता. या लोकांसोबत असलेल्या इतर बैलबंडी काही वेळापूर्वीच नाला पार करून पलीकडे गेल्या. मात्र या पाच जणांच्या बैलबंडी नाला पार करत असताना पुरात अडकल्या. पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिन्ही बैलबंडी पाण्यात उलटल्या. यात हरिदास खाडे, विनायक उपरे, मीना कुडमेथे हे तिघेजण पुरात वाहून गेले. मनीषा सिडाम व मीना सिडाम या दोघी प्रवाहातून सुखरूप बाहेर पडल्याने बचावल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. प्रशासनास माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार, तहसीलदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मीना कुडमेथे या महिलेचा मृतदेह गुरुवारीच आढळला. उर्वरित दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला. मात्र शोधकार्यात अडचणी येत असल्याने शुक्रवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा घटनास्थळापासून एक किलोमीटरवर नाल्याच्या कडेला दोघांचेही मृतदेह आढळले. या पुरात विनायक उपरे यांची एक बैलजोडीही पाण्यात बुडून मरण पावली.

मीना कुडमेथे या महिलेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीला पाठवण्यात आले.