13 July 2020

News Flash

नांदेडात तिघांचा बुडाल्याने मृत्यू

होळीचा उत्सव साजरा करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने पाण्यात बुडून घडलेल्या दुर्घटनेत दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. अन्य एका घटनेत विहिरीत बुडून महिलेचा

| March 19, 2014 01:48 am

होळीचा उत्सव साजरा करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने पाण्यात बुडून घडलेल्या दुर्घटनेत दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. अन्य एका घटनेत विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत हे प्रकार घडले. शिवाय बेदरकार वाहन चालविणारे अनेक जण गंभीर जखमी झाले.
धूलिवंदनाच्या पाश्र्वभूमीवर रंग खेळून गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या दोघांना जलसमाधी मिळाली. नीलेश पटेल (वय २४) व विनय गिरबिडे (२७) अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघे विष्णुपुरीलगत काळेश्वर घाटावर अंघोळीस गेले होते. गोदावरी नदीत ते उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. जीवरक्षक दलाच्या मदतीने पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले. सिडको पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
रंगपंचमी शांततेत व उत्साहात साजरी करा, असे आवाहन करणाऱ्या नांदेड पोलीस प्रशासनाने शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. प्रमुख चौकात बॅरीकेड्स लावून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, तरीही पोलिसांची नजर चुकवून बेदरकार गाडी चालविणारे अनेक जण गाडीवरून घसरून पडल्याने जखमी झाले. शहरातील काही खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या अशा जखमींची संख्या मोठी होती.
दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळय़ा मोहिमा राबविल्याने अनधिकृत विकली जाणारी लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली. इतवारा उपविभागाचे सहायक पोलीस उपअधीक्षक पंकज देशमुख यांनी नांदेड-लातूर रस्त्यावरील ईश्वर ढाब्यावर छापा टाकून सुमारे ८० हजारांची दारू जप्त केली. नांदेड शहरातील इतवारा, कंधार तालुक्यातील कौठा, लोहा तालुक्यातील वडेपुरी, बेटसांगवी, सोनखेड व नायगाव तालुक्यातील कुंटूर, धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे छापे टाकून पोलिसांनी लाखो रुपयांची दारू ज्पत केली. या प्रकरणी १६जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले, सहायक अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक विजय कबाडे यांच्यासह सर्वच अधिकारी दिवसभर रस्त्यावर होते.
सायंकाळी शीख समाजाचा हल्लाबोल महोत्सव उत्साहात साजरा झाला. गुरुद्वारातून गुलालाची उधळण व विविध कवायती सादर करीत युवकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ‘वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फत्ते’चा गजर करीत निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप चिखलवाडी येथे झाला. या वेळी शहरातील वेगवेगळय़ा पक्षांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2014 1:48 am

Web Title: three death sink nanded
टॅग Nanded
Next Stories
1 ‘चितळे समिती हा घोटाळ्याच्या आरोपातून बाहेर पडण्याचा मार्ग’
2 आर्णीत राज्यस्तरीय बंजारा लेंगी महोत्सव थाटात
3 सात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Just Now!
X