बीड : कपडे धुण्यासाठी माजलगाव धरणातील टाकीजवळ गेल्यानंतर मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी माजलगावमध्ये घडली. मृतांमध्ये माय-लेकासह मावस बहिणीचा समावेश असून तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील शेख नश्शो शेख नजीम (वय ३०) ही महिला मंगळवारी सकाळी मुलगा सोहेल (वय ११) आणि बहिणीची मुलगी शेख तब्बो (वय १४) यांच्यासह माजलगाव धरणातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धूत असताना मुलगा सोहेल हा पाण्यात खेळत होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. ते पाहून आई शेख नश्शो व मावस बहीण शेख तब्बो या दोघांनीही पाण्यात उडी घेऊन सोहेलला वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पातील पाणी खोल होते. त्यातच महिलेला पोहता येत नसल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. आजूबाजूच्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर अनेकजण धावून आले. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले, परंतु तोपर्यंत तिघेही मृत झाले होते. माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथील शेख मोहम्मद यांची शेख नश्शो ही मुलगी असून दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथून आई-वडिलांना भेटण्यासाठी ती माहेरी आली होती.