23 October 2019

News Flash

दुर्दैवी ! गाढ झोपेत असताना कोसळली घराची भिंत, गर्भवती महिलेसह सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बुलडाण्यात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

बुलडाण्यात घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये गर्भवती महिलेसह सहा वर्षांच्या लहान मुलाचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेमुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात दिवसभर हलका पाऊस सुरु होता. रात्री शेख कुटुंबीय गाढ झोपेत असताना यावेळी त्यांच्या घराशेजारील घराची भिंत कोसळली. अचानक झालेल्या या दुर्घटनेत शेख कुटुंबातील सर्वच्या सर्व पाचजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते.

दुर्घटनेनंतर शेजाऱ्यांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेख कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आलं. रुग्णालयात दाखल केला असता तिघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये आठ महिन्यांची गर्भवती महिला तसंच सहा वर्षांच्या लहान मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First Published on September 20, 2019 5:17 pm

Web Title: three died after wall collapse in buldhana sgy 87