पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पांगरबावडी ( ता.बीड ) येथे घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवार दि.१६ एप्रिल रोजी मयूर जाधव याच्यासह काही युवक पोहण्यासाठी गेले होते. वळण रस्त्यालगतच्या नखाते यांच्या खदाणीत पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले. सोबतच्या मुलांनी आरडाओरड करून लोकांना सांगितले. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना व त्या भागातील नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

सदरील तरुण हे शहरातील गांधी नगर भागातील आहेत. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी बीड ग्रामीणचे पोनि.संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनीही पाचारण करण्यात आले. युवकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला होता. तिघेही हे १७ ते २० वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.