सोलापूर शहरानजीक तळे हिप्परगा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. तीनही विद्यार्थी अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात रात्रभर अभ्यास करून चहा पिण्यासाठी ते पहाटे तीनच्या सुमारास बाहेर पडले होते. त्याचवेळी सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर भरधाव ट्रकने त्यांना उडवले. यात या तिघांचा मृत्यू झाला.

संगमेश माळगे (वय २१), दीपक गुमडेल (वय २२) आणि अक्षय आसबे (वय २१) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून ते तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगा येथील आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात शकत होती. अभ्यासासाठी त्यांनी महाविद्यालयातच मुक्काम केला होता. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येथील कँटिनवर आले होते. याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने तिघांना उडवले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. पोलीस व परिसरातील नागरिकांनी त्यांनी त्वरीत रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्वरीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. माळगे व गुमडेल हे सोलापूर शहरात राहत तर आसबे हा विद्यार्थी पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील होता. युवा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.