जि. प. अंतर्गत स्थानिक निधीत अनियमितता-गरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर विशेष लेखा परीक्षण करण्यात आले. या तपासणीत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक व लेखा परीक्षण पथकाला वेळोवेळी मागणी करूनही दस्ताऐवज उपलब्ध केला नाही. या प्रकरणी अंबाजोगाईतील बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता बी. एल.पवळ, एस. एस. पटेल व बी. बी. लांडगे यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी बजावले.
जि. प. अंतर्गत मागील २ वर्षांत तत्कालीन सीईओ राजीव जावळेकर यांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर निधी नसताना कामांना मंजुरी व  देयके अदा करण्यात आली. या प्रकरणी थेट मंत्रालयात तक्रार झाल्यानंतर ग्रामविकास विभागाने जावळेकर, तसेच तत्कालीन लेखा व वित्त अधिकारी वसंत जाधवर यांना निलंबित करण्याचे आदेश बजावले. तसेच जि. प.तील विकासनिधीच्या कामातील गरप्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण सुरू करण्यात आले. मागील ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लेखा परीक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. हजारो संचिका गायब करण्यात आल्या. या बाबत प्रशासनाला वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागली. याच दरम्यान अंबाजोगाई येथील जि. प. बांधकाम विभागातील उपअभियंता बी. एल. पवळ, एस. एस. पटेल व बी. बी. लांडगे यांनी लेखा परीक्षण काळात पूर्ण दस्ताऐवज संचिका उपलब्ध करून दिल्या नाहीत. तसेच दोन कामांमध्ये अनियमितता, फसवणूक झाल्याचे लेखा परीक्षकांनी स्पष्ट केले. यात जवळपास ५० लाख रुपये रकमेचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे सीईओ नामदेव ननावरे यांनी तिन्ही अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत.