लगतच्या छत्तीसगड राज्यातील सुकमा व दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातल्याच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिस दलाने सीमावर्ती भागात नाकेबंदी करीत नक्षलवाद्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेदरम्यान दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी टिपागड दलम सदस्य कालिदास उर्फ रामसाय चमरू दुग्गा (२५), राधा उर्फ मनसारू रतू हिडामी (२४) व कंपनी नं.१० सदस्य तुळशीराम उर्फ कृष्णा मंगलसिंग हिडामी (२५) यांना अटक करण्यात आली आहे.
सलग दोन दिवस नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सुकमा व दंतेवाडा येथे पोलिस शहीद झाल्यानंतर सीमा बंद करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. गडचिरोलीत ३० एप्रिल रोजी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.
कालिदास दुग्गा व राधा हिडामी खोब्रामेंढा याच्यावर देवस्थान चकमक, जयराम नरोटे हत्या प्रकरण, कोहकोबोडी येथील बिजेसिंग हलामी हत्या प्रकरण, सोनसरी चकमक, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आदी गुन्हे दाखल आहेत. तुळशीराम उर्फ कृष्णा हिडामी याला शस्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता कालीदास दुग्गा व राधा हिडामी यांची २० एप्रिलपर्यंत, तर तुळशीराम हिडामी याची १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुग्गा व हिडामी यांच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three extreme naxalites arrested
First published on: 15-04-2015 at 01:13 IST