रत्नागिरीजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या दोन विचित्र अपघातात आई-वडील आणि त्यांची मुलगी यांना आपले प्राण गमवावे लागले. प्रवीण रामचंद्र कदम, त्यांची पत्नी प्रियांका आणि मुलगी धनश्री असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत.
प्रवीण कदम, पत्नी आणि मुलीसह स्वतःच्या रिक्षामधून रत्नागिरीहून खेडच्या दिशेने जात असताना संगमेश्वरजवळ त्यांच्या रिक्षाला समोरून येणाऱया चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांची रिक्षा पलटी झाली. या अपघातात कदम यांची मुलगी जागीच ठार झाली. तिला तातडीने रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समजल्याने प्रवीण कदम हादरून गेले. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास धनश्रीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला रत्नागिरीमध्ये नेण्याचे ठरले. यानंतर प्रवीण कदम आणि त्यांची पत्नी यांना एका चारचाकी गाडीतून आणि मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून खेडच्या दिशेने नेण्यात येत होता. त्याचवेळी पानवल गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरवर ठेवलेले जेसीबी त्यांच्या चारचाकी वाहनावर पडून पुन्हा अपघात झाल्यामुळे प्रवीण कदम, त्यांची पत्नी प्रियांका यांचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच काळाने घाला घातल्याने तिच्या आई-वडिलांनाही प्राणाला मुकावे लागले. अवघ्या चार तासांच्या अंतराने झालेल्या या दोन अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. कदम यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वृद्ध आई-वडील आणि एक मुलगाही आहे.