जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, सोमवारी ढेकणमोहा येथील कैलास आसाराम थापडे या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सोसायटी व बँकेचे कर्ज थकल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे मृताच्या नातेवाइकांनी सांगितले. रविवारी आंधळेवाडीतील जािलदर आंधळे यांनीही विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत इंडिया बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याचे म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी भोगलवाडी येथील रामकिसन सखाराम मुंडे यांनी कन्नूर येथे ऊस तोडत असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली.
जिल्ह्यात मागील वर्षभरापासून आत्महत्यांचे सत्र थांबेनासे झाले आहे. प्रत्येक दिवस आत्महत्येचे वृत्त घेऊनच येत लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. आत्महत्येनंतर मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आडवळणाच्या गावातही पुढाऱ्यांची रीघ लागते आणि मदतीचे हात पुढे होतात. मात्र, आत्महत्या होऊ नयेत, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
तालुक्यातील ढेकणमोहा येथे दोन दिवसांपूर्वी विष घेतलेल्या कैलास आसाराम थापडे या २५वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. इंडिया बँकेसह सोसायटय़ांचे त्यांच्यावर कर्ज होते. कर्जबाजारीपणातूनच ही आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. रविवारी पहाटे आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील जािलदर नारायण आंधळे (वय ५५) या शेतकऱ्यानेही विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. गृहराज्यमंत्री राम िशदे, आमदार भीमराव धोंडे यांनी आंधळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व सरकारकडून मदत देण्याची ग्वाही दिली. धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील शेतकरी रामकिसन सखाराम मुंडे हा कर्ज फेडण्यास कर्नाटकातील कन्नूर येथे ऊसतोडणीच्या कामाला गेला होता, मात्र ऊसतोडणी करूनही कर्ज फेडू शकत नाही, या विवंचनेत रामकिसन याने कन्नूर येथेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.