‘आमच्या शेताचा मसनवाटा झालाय. आणखी किती दिवस नुसती पाहणी करणार? असंच राहिलं, तर आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’, अशा प्रतिक्रियांना केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यास आलेल्या तीन सदस्यीय पथकाला शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे आधीच तीन तासांचा असलेला दौरा लवकर उरकण्याची नामुष्की पथकावर आली.
तुम्ही दुष्काळाची पाहणीसुद्धा हमरस्त्यावरून करता. गावात या, शेतात या. आत खेडेगावात येऊन पाहणी करा. वस्तुस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे हे दिसेल, असे भंडावून सोडणारे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बोलण्यापासून अडविले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून पथकानेही अखेर काढता पाय घेतला.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुबार पेरणीसाठी दीड हजार रुपयांची जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत पथकासमोरच या निर्णयाला विरोध केला. दुपारी वाशी येथून सुरू झालेला हा दौरा महाळंगीत संपला. दुष्काळाची पाहणी अंधारात सुरू असताना माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीवर आक्षेप घेतला. अंधारात सुरू असलेली पाहणी बंद करा आणि दुष्काळ पाहायचा असेल तर उजेडात या, अशा शब्दांत त्यांनी पथकासमोर आपली भूमिका मांडली.
‘शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज’
मराठवाडय़ातील दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. कायमस्वरूपी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तशा उपाययोजना सुरू राहतील. मात्र, सध्याची स्थिती पाहता दुष्काळ अधिक तीव्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे, असे मत राघवेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. या बाबत मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. विभागीय आयुक्त दांगट, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते.