सातारा जिल्ह्यामध्ये रविवारी करोनाबाधित नवे ३१ रुग्ण निष्पन्न झाले तर आज सातारा जिल्हा रुग्णालयात दोघांचा मृ्तयू झाला आहे. यातील एक करोनाबाधित तर दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, आज सातारा कारागृहातील करोनाबाधित झालेले ६ रुग्ण उपचारांती बरे झाल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात आजवर करोना संशयित म्हणून एकूण ५,१०२ जणांच्या घशांच्या स्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले गेले. त्यात ३०९ करोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. सध्या १८० रुग्ण उपचार घेत असून, १२२ जण उपचारांती बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेत. तर, ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकंदर ३०९ करोनाग्रस्तांपैकी १४३ (सुमारे ४७ टक्के) रूग्ण एकटय़ा कराड तालुक्यातील आहेत. पाठोपाठ सातारा तालुक्यात ४२ तर पाटण तालुक्यात २५ करोनाबाधितांची नोंद आहे. ‘ई-पास’ घेऊन २४ मेअखेर जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची संख्या १ लाख ९ हजार ६०४ असल्याची आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. त्यातील हजारो लोक गृह विलगीकरणात असून, संस्थात्मक विलगीकरणातही दिवसागणिक भर पडत आहे.

दरम्यान, करोनाबाधितांची संख्या धक्कादायकरीत्या झपाटय़ाने वाढत असल्याने आजचा रमजान ईद सणाचा दिवस संपताच शिथिल करण्यात आलेली टाळेबंदी पुन्हा कडक होण्याच्या चर्चेने लोकांनी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी, घाई सुरू केली आहे. मात्र, या चर्चेबाबत यंत्रणेकडून कोणताही अंदाज अथवा मत व्यक्त केले जात नाही. त्यामुळे टाळेबंदीची अफवा सध्या उलट-सुलट चर्चेचा विषय बनली आहे.

वाईतील दोघांचा मृत्यू

सातारा जिल्हा रुग्णालयात आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये आसले (ता. वाई) येथील ७० वर्षीय व्यक्तीला कालच करोना असल्याचे निष्पन्न झाले होते. तर वाई तालुक्यातीलच जांबळी येथील ५२ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. या दोन्ही व्यक्तींना मधुमेह होता. यातील दुसरी व्यक्ती करोना अनुमानित असून त्याच्या घशाच्या स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. या दोन्हीही व्यक्ती मुंबईहून प्रवास करुन आलेल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.