गेल्या आठवडय़ात तीन दिवस लहर फिरलेला पाऊस शनिवारपासून परतला. रविवारी जिल्ह्य़ात सर्वदूर हजेरी लावताना किनवट व माहूरमध्ये त्याने कहर केला. किनवटमध्ये ७९.२८, तर माहूरमध्ये ८३.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्ही तालुक्यात ३ इंचांपेक्षा अधिक पाऊस झाला. किनवटमध्ये सोमवारी सकाळीही पावसाचा जोर चांगला होता. पैनगंगा नदीपात्रात प्रवाहात वाहून येणारी लाकडे पकडण्यासाठी गेलेला गंगानगरातील शंकर कटारे (वय ८०) हा वृद्ध वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
या वर्षी तरी पाऊस सरासरीएवढा पडावा, अशी नांदेडकरांची प्रार्थना आहे. गतवर्षी केवळ ४४ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानभरपाई दिली; परंतु जिल्हा बँकेच्या भोंगळ कारभाराने अजून अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही. पीककर्जाबाबतही शेतकरी समाधानी नाही. या पाश्र्वभूमीवर या वर्षी सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी सकाळपासूनच ढग दाटून आले होते. सूर्यदर्शन घडले नाही. उशिरापर्यंत रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. परंतु तब्बल १ हजार २४० मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या किनवट व माहूरमध्ये तब्बल ३ इंचांपेक्षा अधिक पाऊस झाला. किनवटमध्ये ९७.२८ व माहूरमध्ये ८३.७५ मिलिमीटर, अर्थात अतिवृष्टी झाली. हिमायतनगर ३०, हगदावमध्ये २१.२८, भोकरमध्ये २०.५० मिलिमीटर पाऊस झाला. मुदखेड १२.६७, अर्धापूर, उमरी ९.३३, कंधार ३.१७, लोहा ४.३३, देगलूर ४.८३, बिलोली ८.२०, धर्माबाद ९, नायगाव ७ आणि मुखेडमध्ये २.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हाभरात एकूण ३१०.९९ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो १ हजार ९४४ मिलिमीटर भरतो. जिल्ह्य़ात आजवर १४७.४६ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी १५.४३ भरते.
दरम्यान, सोमवारीही सकाळपासून सूर्यदर्शन घडले नाही. आकाशात ढगांची गर्दी होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला.
नांदेडसह गोदावरी नदीच्या वरच्या भागात सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक चांगली सुरू आहे.
जवळपास २५ टक्के प्रकल्प भरला. संपूर्ण मराठवाडय़ातच गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे विविध ठिकाणचे जलाशय भरलेच नाहीत. आकाराने खूप लहान असलेल्या, परंतु नांदेड शहराची तहान भागविण्याऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातही जेमतेम साठा होता. तरीही महापालिकेच्या काटेकोर नियोजनामुळे संपूर्ण उन्हाळ्यात पाण्यावाचून हाल झाले नाहीत. उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात चार दिवसांआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय महापालिकेने घेतला, त्याचाही शहरवासियांना फायदाच झाला.
दरम्यान, मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीच दोन ते तीन चांगले पाऊस झाले. गोदावरी नदीच्या वरच्या टप्प्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली. तत्पूर्वी सिद्धेश्वर आणि येलदरी धरणातून १२ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय दिला होता. परंतु तो प्रत्यक्षात आलाच नाही. तरीही पावसाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात दाखल होत असून गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला प्रकल्पात जवळपास ७ टक्के जलसाठा झाला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच २४.५८ टक्के साठा आहे.