किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरात प्रात:र्विधीसाठी गेलेले तीनजण बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला.
सरासरीपेक्षा कमी पाऊस, तसेच वनविभागाने प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था न केल्याने अनेक भागातील प्राणी मानवी वस्तीत खुलेआम येऊ लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात कोणतेच स्रोत नसल्याने प्राण्यांना मानवी वस्तीशिवाय अन्य कोणताच पर्याय राहिला नाही. मात्र, प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे अनेक गावांतील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. मनुष्यबळ, तसेच अत्याधुनिक साधनसामग्रीची कमतरता असल्याने वन अधिकारी हतबल झाले आहेत. तेलंगणा सीमेवरील दुर्गानगर तांडा येथील काही व्यक्ती नेहमीप्रमाणे प्रात:र्विधीसाठी जंगलात गेले होते. या वेळी अचानक बिबटय़ाने तिघांवर हल्ला केला. यात रंगराव सुक्या राठोड (वय ४५), ललिता भीमराव राठोड (वय ३२) व प्रल्हाद राठोड (वय ३८) हे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनी मदतीसाठी आरडाओरड केली; पण ग्रामस्थ मदतीला धावून येईपर्यंत बिबटय़ाने या तिघांचे लचके तोडले होते. ग्रामस्थ धावल्यानंतर बिबटय़ाने धूम ठोकली. नागरिकांनी जखमी तिघांना तत्काळ इस्लापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून तिघांना नांदेडच्या गुरूगोिवदसिंग रुग्णालयात आणण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक असली तरी धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. पेहरकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शासन निर्देशानुसार तिन्ही जखमींच्या नातेवाईकांना तत्काळ प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. या भागात बिबटय़ाचा संचार वाढल्याने त्वरित िपजरे लावण्यात येतील, शिवाय फिरते पथक पाठविण्यात येईल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर भागात बऱ्यापकी जंगल आहे. या जंगलांमध्ये विविध प्राण्यांचा मुक्त संचार आहे. पावसाने दडी मारल्याने पाणवठे आटले, तसेच नदी-तलाव कोरडेठाक आहेत. या पाश्र्वभूमीवर प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वन्यप्रेमी संघटनांनी केली आहे.