ट्रकवर बस आदळून तीन प्रवाशांचा मृत्यू, मतदानासाठी जाणारे सोळा जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ  नादुरुस्त ट्रकवर प्रवासी बस आदळून तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातात सोळाजण जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील वाझोळी गावचे रहिवासी असलेले प्रवासी मूळगावी मतदानासाठी गावी जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वाचारच्या सुमारास मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर मौजे बोर गावाजवळ मुंबई-पुणे मार्गिकेवर ट्रकचा टायर  फुटल्याने ट्रक कडेला थांबविण्यात आला होता. त्यावेळी मुंबईहून कोल्हापूरकडे जय भवानी ट्रॅव्हल्स कंपनीची बस जात होती. अंधारात थांबलेल्या ट्रकवर बस आदळली. गंभीर जखमीप्रवाशांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.

सयाजी पांडुरंग पाटील (वय ६५), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५, दोघेही रा. वझोळी, ता. पाटण, जि. सातारा), मोहनकुमार शेट्टी (वय ४२,रा. वांगणी, बदलापूर, जि. ठाणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत.  अपघातात बाबासाहेब पांडुरंग पाटील, सुवर्णा बाबासाहेब पाटील, गणेश अरुण पाटील, सूरज आनंदराव पाटील, शैलेश हनुमंत पाटील, अनिल मधुकर पाटील, जयसिंग खाशाबा पाटील, विश्वनाथ तुकाराम पाटील, आकाश जयसिंग पाटील, भिवाजी चंदू पाटील, विशाल किसन पाटील, तुकाराम सावळाराम भिंगारदिवे, मंगल जयसिंग पाटील, शंकर थोरात, राणी मंगेश देसाई (सर्व रा. वाझोळी, ता. पाटण, जि. सातारा) तसेच बसचालक जखमी झाला.

वाहन थांबविणे धोकादायक : गेल्या महिन्यात पुण्यातील डॉक्टर केतन खुर्जेकर, त्यांच्या बरोबर असलेले दोन सहकारी डॉक्टर मुंबईहून पुण्याकडे मोटारीतून जात होते. देहूरोडजवळ द्रुतगती मार्गावर डॉ. खुर्जेकर यांच्या मोटारीचे चाक पंक्चर झाले. मोटारीचा चालकाने मोटार द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला थांबविली. त्यावेळी खासगी प्रवासी बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डॉ. खुर्जेकर, मोटारचालक तसेच त्यांच्या बरोबर असलेल्या दोन सहकारी डॉक्टरांना धडक दिली. अपघातात डॉ. खुर्जेकर यांच्यासह मोटारचालकाचा मृत्यू झाला होता. द्रुतगती मार्गावर नादुरुस्त वाहने थांबविणे धोकादायक असून यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात द्रुतगती मार्गावर घडले आहेत.

मतदानासाठी गावी जाताना.. 

बहुतेक प्रवासी मुंबईत नोकरीनिमित्ताने वास्तव्यास आहेत. सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील वाझोळी गावचे रहिवासी असलेले प्रवासी मूळगावी मतदानासाठी गावी जात होते. त्यावेळी द्रुतगती मार्गावर अंधारात थांबलेल्या नादुरूस्त ट्रकवर बस आदळली.