News Flash

बीडमध्ये तिघांचा मृत्यू ; उष्माघाताने झाल्याचा दावा

तीन दिवसांपासून उष्मांकाने ४६ अंशांचा पारा गाठल्याने बीड जिल्हा होरपळून निघाला आहे

बीड : तीन दिवसांपासून उष्मांकाने ४६ अंशांचा पारा गाठल्याने बीड जिल्हा होरपळून निघाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांशी शेतकरी छावण्यांमध्ये तर महिला आणि मुले टँकरच्या मागे हंडाभर पाण्यासाठी धावत असताना उष्मांकाने उच्चांक गाठल्याने जिवाची काहिली झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसात ऊन लागल्यामुळे तिघाजणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असल्याने वाढत्या उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे.

बीड शहरातील माळीवेस भागात राहणारे चंद्रकांत हिरवे (वय ४०) हे  ऊन लागल्याने बेशुध्द पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. तर अंबाजोगाई तालुक्यातील बनसारोळा येथील विक्रम भीमराव गायकवाड (वय ३८) हे अनुकंपा तत्त्वावर पोस्टमनचे काम करत होते. त्यांना अचानक ताप आल्याने रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला, तर कदमवाडी येथील परमेश्वर दादाराव वाघ (वय ४४) हे शेतात काम करत असताना त्यांना चक्कर आली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत तिघांच्याही कुटुंबीयांनी ऊन लागल्यामुळेच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

बीड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य शेतकरी जनावरांना जगवण्यासाठी छावणीच्या आश्रयाला असून सहाशे छावण्यांमध्ये चार लाखांपेक्षा अधिक पशुधन सांभाळले जात आहे. तर दुसरीकडे साडे आठशे गावे आणि वस्त्यांना साडे सातशे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी महिला आणि मुले दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्मांक वाढला असून रविवारी आणि सोमवारी पारा ४५ पर्यंत गेल्याचे चित्र अनेक गावात दिसून आले. सकाळी आठपासूनच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरांमध्ये रस्त्यांवर स्मशान शांतता पसरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:59 am

Web Title: three killed in beed may caused by heatstroke
Next Stories
1 मराठवाडय़ात उष्णतेची लाट कायम राहणार
2 शिर्डीत मतदानासाठी रांगा
3 जवान चंदू चव्हाणांविरोधात गुन्हा
Just Now!
X