झाडावर वीज पडून झाडाखाली उभ्या असलेल्या तिघांचा जागीच मृत्यु झाला. तर पाच वर्षाच्या मुलासह एका वृद्ध महिला जखमी झाली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव भागडे येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. पाचही जण सोयाबीनची कापणी करण्यासाठी शेतात गेले होते.

जालना तालुक्यातील सावरगाव भागडे येथील गयाबाई गजानन नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी सकाळी सोयाबीनची कापणी सुरू होती. सोयाबीन कापणीसाठी सावरगाव भागडेसह सेवली येथील मजूरही कामाला आले होते. शेतमजूर सोयाबीनची कापणी करीत असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस येत असल्याने गयाबाई नाईकनवरे व इतर पाच जण जवळच असलेल्या झाडाखाली जाऊन बसले. तर इतर मजुरांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला.  मात्र त्यावेळी अचानक झाडावर वीज कोसळली. या घटनेत गयाबाई गजानन नाईकनवरे (३८, रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश संदीप पवार (०५) सुमनबाई साहेबराव नाईकनवरे (६५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.