माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध नाराजीने निर्णायक वळण घेतले आहे. जिल्हाध्यक्ष अशोक डक व रमेश आडसकर यांनी नाराज नेत्यांची मोट बांधत सोळंकेंना एकटे पाडून बंडाचा झेंडा रोवला. दोन तालुक्यांतील बठकीत कार्यकर्त्यांनी सोळंके यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवून आडसकरांना पसंती दिली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.
माजलगाव मतदारसंघात वडवणी व धारूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीअंतर्गत तिन्ही तालुक्यांत नेत्यांची स्वतंत्र संस्थाने आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी जिल्हाध्यक्ष डक, आडसकर, मोहनराव जगताप, सहाल चाऊस यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील नेत्यांनी खारीचा वाटा उचलला. निवडणुकीनंतर सोळंके यांना राज्यमंत्री म्हणून चार वष्रे संधी मिळाली. मात्र, या काळात सोळंके यांच्याकडून मतदारसंघात पक्षात कोणी सक्षम होऊ नये, या साठीच प्रयत्न झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांतून होत आहे. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याचे धोरण सोळंके यांनी राबवल्यामुळे मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघात कार्यकर्त्यांमधील असंतोष उघडपणे व्यक्त होत आहे.
धारूर नगराध्यक्षापद निवडणुकीत सोळंके यांनी थेट भाजपबरोबर युती केली, तेव्हापासून या भागाचे नेते रमेश आडसकर दुरावले गेले. जिल्हाध्यक्ष डक स्थानिक असल्याने त्यांना कार्यक्रमातून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. अॅड. एकनाथ आवाड यांचा थेट शरद पवार यांच्याशी संबंध आहे. मात्र, जि. प.त गयाबाई आवाड यांना सभापतिपद मिळू नये, या साठीही सोळंके गटाकडून प्रयत्न झाले. मोहन जगताप, अच्युतराव लाटे या नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नसल्याचा आरोप झाला. निवडणुकीनंतर सोळंके कायम पुणे, मुंबईकडेच मुक्कामाला असल्याने तालुका, गावपातळीवरील कार्यकर्त्यांत मोठया प्रमाणात नाराजी निर्माण झाली. त्यातूनच लोकसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून तब्बल साडेचौतीस हजारांचे मताधिक्य भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना मिळाले.
आताही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सोळंके यांनी डेरा टाकून संपर्क सुरू केला आहे. मात्र, मागील आठवडय़ात जिल्हाध्यक्ष डक यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बठक झाली. या बठकीत सोळंके यांच्याविरुद्ध बंडाची रणनिती तयार झाली. डक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी धारूर व वडवणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बठक झाली. या बठकीस तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी उघडपणे सोळंके यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत आडसकर यांना पसंती दिली. माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे चिरंजीव रमेश यांनी ५ वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर सव्वापाच लाख मते घेतली. या मतदारसंघात आडसकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील १५ वर्षांत राष्ट्रवादीला डक-आडसकर या जोडगोळीने अनेकदा यश मिळवून दिले.