तीन महिन्यांपासून मानधन नाही; करोनाकाळात संरक्षण साधनांचाही अभाव

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : करोना संकटाच्या काळात महापालिकेच्या ‘फीव्हर क्लिनिक’मध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सर्वसामान्यांचे आरोग्य सांभाळणाऱ्या डॉक्टरांच्या आर्थिक आरोग्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे डॉक्टरांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली आहे.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत करोना संकटाने थैमान घातले आहे. तपासणी केंद्रांसाठी साथप्रतिबंधक कायद्याचा आधार घेऊन पालिकेने विविध खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेक खासगी डॉक्टर या तपासणी केंद्रांमध्ये सेवा देत आहेत. त्यांच्या सुरक्षेकडेही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी तर डॉक्टरांना पालिकेकडून वैयक्तिक संरक्षक साधनेही उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे डॉक्टरांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली आहे. वसई तालुका आयुर्वेदिक ग्रॅज्युएट वेल्फेअर असोसिएशन, वसई तालुका होमिओपॅथी असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन—वसई, नालासोपारा डॉक्टर्स असोसिएशन या संघटनांनी डॉक्टरांवर होत असलेल्या अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉक्टरांच्या मागण्या

’ पालिकेने अधिग्रहित केलेल्या डॉक्टरांना लेखी आदेशपत्र मिळावे.

’ एप्रिल महिन्यापासून कार्यरत असणाऱ्या खासगी डॉक्टरांवर पालिकेच्या सेवेत रुजू होण्यासाठी सक्ती करू नये.

’ फीव्हर क्लिनिकमध्ये कार्यरत डॉक्टरांना मुखपट्टी, पीपीई किट तथा अन्य संरक्षण साधनांचा त्वरित पुरवठा करावा.

’ डॉक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण कवच द्यावे.

’ करोनाकाळात पालिकेच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना इतर महापालिकांप्रमाणे मानधन देण्यात यावे.

’ करोनाकाळात सेवा देताना संसर्ग झाल्यास आजाराची तीव्रता पाहून त्यांना सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात.

’ ज्येष्ठ तथा विविध व्याधींनी ग्रस्त डॉक्टरांना करोनाकाळात पालिकेच्या सेवेत समाविष्ट करू नये.

’ करोनाकाळात आवश्यक औषधांचा मुबलक साठा करावा.