लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यामध्ये शनिवारी आणखी तीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ११३ झाली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३२ अहवाल नकारात्मक, तीन अहवाल सकारात्मक आले आहेत. प्राप्त सकारात्मक अहवाल हे लोणार तालुक्यातील ब्राम्हण चिकना येथील २५ वर्षीय तरुणी, भुमराळा येथील ४० वर्षीय महिला आणि खामगाव तालुक्यातील जनुना येथील ३४ वर्षीय पुरुष रुग्णांचे आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ७७ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात ३२ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ३८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १७११ अहवाल नकारात्मक आले आहेत.