शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. करोनाबाधिताच्या संपर्कातील या दोन्ही महिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एकासा करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर, तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी व ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे. दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपूरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची देखील प्रकृती स्थिर आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २ जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६ जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १० जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) आणि १४ जून रोजी ( एकूण ३ बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील करोनाबाधीतांची संख्या ४७ झाली आहे. आतापर्यत २४ बाधीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४७ पैकी उपाचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे.