सांगली : मिरजेच्या भारतनगरमधील महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे रात्री करोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाल्याने गुरुवारी हा परिसर सील करण्यात आला. तर आटपाडी तालुक्यात आलेल्या दोन व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असल्याचे नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. तर तीन रुग्णांचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांची करोनातून मुत्तता झाली आहे.

मिरजेतील भारतनगरमध्ये वास्तव्य असलेल्या दिल्लीहून आलेल्या ३० वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे, तर आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे सातारा जिल्ह्य़ातील मायणी येथून आलेल्या एकाला आणि मुंबईहून आटपाडीत आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाली असल्याचे बुधवारी रात्री मिळालेल्या करोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले.

मिरजेतील भारतनगर परिसरात करोना रुग्ण आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या परिसराची पाहणी केली. या भागात आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड सव्‍‌र्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा वर्कर्स आणि डॉक्टर यांच्यामार्फत या परिसरातील नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली आणि मिरजेतील होळी कट्टा येथे आढळलेल्या बाधित दोन महिलांची करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. या दोन महिलांना उपचारानंतर करोनापासून मुक्ती मिळाली असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्य़ात करोनाग्रस्त असलेल्या २६ रुग्णांवर सध्या मिरजेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.