नागपुरात बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागात खुनाच्या तीन घटना घडल्या. यामध्ये एक भाजी विक्रेता, एक तरुण आणि एक व्यापारी यांच्या हत्या झाल्या. पोलिसांनी या तिन्ही घटनांचा तपास सुरु केला आहे. मात्र शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? हा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.

नंदनवन पोलीस स्टेशनजवळ भाजीचा व्यवसाय करणाऱ्या मोहम्मद शेख यांच्या ठेल्यावरुन काही गुंडांनी भाजी घेतली मात्र पैसे देण्यास नकार दिला. भाजीवाल्याने ही गोष्ट त्याच्या मित्रांना सांगितली. आसिफ आणि त्याचा मित्र सय्यद यांनी या गुंडांकडे पैसे मागितले. तेव्हा त्या गुंडांनी या दोघांना मारहाण केली. त्यानंतर एका गुंडाने इम्रानला चाकून भोसकले आणि त्याची हत्या केली. तर आसिफ शेखला गंभीर जखमी केले. दुसरी घटना नंदनवन पोलीस स्टेशनजवळ विकी डहाके या तरुणाची शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. तर तिसरी घटना बैरामजी टाऊन भागात घडली. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली.

एका रात्रीत अवघ्या चार तासाच्या कालावधीत घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.