विजय राऊत

राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरूवारी रात्री गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड व इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिक कडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे  विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली अशी माहिती समोर आली आहे. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची नासधूस केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. ठाणे येथील एका समाजसेवकाला मारहाण झाली होती. तसेच पोलिसांच्या गाडीवर व एका खासगी वाहनांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली होती.

दरम्यान यासंदर्भात पालघर जिल्हा पोलिसांनी देखील समाजमाध्यमांवर पसणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात पालघर पोलीस पोलिसांनी यापूर्वी खालील आवाहन केले होते:

  • सोशल मीडियावरील मॅसेज फॉरवर्ड करताय, तर सावधान पोलीस तुमच्या मागावर आहेत
  •  सोशल मीडियावर कोरोना संदर्भात चुकीचे माहिती प्रसारीत करु नये.
  • कोणत्याही धर्माच्या, समाजाच्या भावना दुखावतील तसेच दोन धर्मांमध्ये, समाजामध्ये, जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश टाकु नका.
  • अशा प्रकारचे कृत्य कोणी केल्यास अथवा त्यास प्रोत्साहन दिल्यास सदर इस्मानविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  • गावात चोर आले आहेत अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये
  • कोणी संशयीत व्यक्ती आपले परिसरात आढळल्यास त्या व्यक्तीस मारहाण करु नका,
  • अशा संशयीत इसमाबाबत नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधुन माहीती द्यावी.
  • मारहाण केल्यास सदर मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यास आपल्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.