खामगांव येथील स्थानिक बर्डे प्लॉट भागातून गाईची चोरी करून तिची कत्तल करणाऱ्या तिघांना गाईच्या मालकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही खळबळजनक घटना काल, मंगळवारी सकाळी शौकत कॉलनीत घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गोवंश हत्याबंदीचा खामगावातील पहिलाच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अजयसिंह राजहंससिंह ठाकूर (३२,रा. ठामुरवाडा बर्डे प्लॉट) यांची लाल रंगाची गर्भवती गाय १५ जूनला बेपत्ता झाली. ठाकूर गाईचा शेध घेत असतांना त्यांना सकाळी ६.३० वाजता बर्डे प्लॅट भागातील शेख इसा शे. बिसमील्ल व त्यांची मुले श. युसुफ शे. इसा (४५) आणि शे. अन्सार शे. ईसा हे तिघे शौकत कॉलनीमधून सायकलीवर पोत्यात जनावरांचे मांस घेऊन जाताना दिसले. यावेळी ठाकूर यांनी संशयावरून त्यांना पकडून पोत्याची पाहणी केली असता त्यात गाईची कातडी आणि तिचे मांस आढळले. गाईची कातडी पाहून ही गाय आपलीच असल्याचे ठाकूर यांच्या निर्दशनास आले. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यावरून तातडीने घटनास्थळी ठाणेदार वसुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जाऊन या तिघांना ताब्यात घेतले. तसेच गाईची कातडी आणि मांस जप्त करून ठाकूर यांच्या तक्रारीवरून शे. इसा शे. बिस्मील्ल, शे. युसुफ शे. इसा व शे. अन्सार शे. इसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शौकत कॉलनीत गाईची कत्तल झाल्याची बातमी शहरात पसरताच गोवंशप्रेमींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी शिवाजीनगरात पोहोचून गोवंशप्रेमींची समजूत घातली.