News Flash

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवत १६ लाखांचा गंडा; राज्यात मोठं रॅकेट असल्याची शक्यता

करोडोंची माया जमा केल्याचा पोलिसांचा अंदाज 

प्रातिनिधिक

रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस पदाची (टीसी) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन राज्यात सक्रिय असलेल्या रॅकेटने तिघांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार प्रथमदर्शनी समोर आला आहे. या रॅकेटने तिघांची तब्बल १६ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या रॅकेटने राज्यातील अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून गंडविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अनिकेत कैलास कोकाटे (रा. देसवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका उर्दू शाळेत शिपाई पदावर गेल्या पंधरा वर्षापासून नोकरी करत असलेल्या भरत नवनाथ खेडकर याची जुलै २०१८ मध्ये पुणे ते औरंगाबादच्या बस प्रवासात अनिकेत कोकाटे याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी कोकाटेने दिल्लीतील रेल्वे भवनात नोकरीला असून, तिथे तिकीट तपासणीस पदाच्या जागा आमच्या कोट्यातून भरल्या जात आहेत. तेव्हा कोणाला नोकरी लावायची असेल तर सांगा असे म्हणाला. मात्र, त्याच्या बोलण्याकडे खेडकर यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर कोकाटे याने आठ दिवसांनी खेडकर यांच्या मोबाइलवर संपर्क साधून मी नोकरीचे काम करून देतो. तुमचा कोणी नातेवाईक अथवा ओळखीचा व्यक्ती असल्यास सांगा असे म्हणाला. त्यावरुन खेडकर यांनी नातेवाईक विशाल तुकाराम ताठे व सुनील विठ्ठल नागरे (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून नोकरीसंदर्भात माहिती दिली. तेव्हा दोघांनी कोकाटे याच्याकडून सविस्तर माहिती घ्या असे खेडकर यांना सांगितले. त्यानंतर खेडकर यांनी कोकाटेला माझे दोन नातेवाईक आहेत. त्यांना नोकरीची गरज असल्याचं सांगितलं. त्यानंतर खेडकरने दोघांना घरी बोलावले. त्यांना सविस्तर माहिती दिली. पुढे दोनच दिवसांनी कोकाटेने औरंगाबाद गाठले. खेडकरच्या घरी गेल्यावर त्याने ताठे व नागरे यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रांची विचारपूस व मागणी केली. यावेळी त्याने नोकरीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले. मात्र, तडजोडीअंती प्रत्येकी आठ लाख देण्याचे ठरले.

यावेळी कोकाटे याने नोकरीसाठी आगाऊ रक्कम द्यावी लागेल. तरच समोरचा व्यक्ती नोकरीचे काम हातात घेईल. तसेच आठ दिवसात नोकरीचे काम होईल असे आश्वासनही दिले. तसेच नोकरीच्या कामासाठी दहा लाख तयार ठेवा. दोघांपैकी एकाला दिल्लीला घेऊन जातो असेही कोकाटे म्हणाला. पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रत्येकी ३ लाखप्रमाणे सहा लाख तर खेडकर यांनी स्वत: जवळील अडीच लाख असे एकुण साडेनऊ लाख रुपये कोकाटेला दिले.

विमानाने दिल्लीला बोलावले
आगाऊ रक्कम म्हणून साडेनऊ लाख रुपये घेतल्यानंतर कोकाटेने ताठे याला विमानाने दिल्लीतील रेल्वे भवनला बोलावून घेतले. त्यानुसार, १६ सप्टेंबर २०१९ रोजी ताठे त्याचे भावजी गोविंद ईप्पर असे दोघे विमानाने दिल्लीला गेले. दुस-या दिवशी कोकाटे हा ताठे थांबलेल्या लॉजवर गेला. त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन दोन दिवसांनी ताठेला वैद्यकीय तपासणीसाठी सोबत नेले. त्यावेळी कोकाटे याने वैद्यकीय अहवाल आल्यावर नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले. त्यामुळे ताठे व त्याचे भावजी ईप्पर हे दिल्लीतील लॉजवरच थांबले. चार दिवसांनी कोकाटे पुन्हा दोघे थांबलेल्या लॉजवर गेला. त्याने २० सप्टेंबर २०१९ रोजी रेल्वेत नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र दिले.

टप्प्या-टप्प्याने उकळली रक्कम
कोकाटेने दिलेल्या नियुक्तीपत्रात ताठेला नोकरीवर रूजू होण्याची तारिख ११ ऑक्टोबर २०१९ अशी देण्यात आली होती. त्यामुळे ताठे व त्याचे भावजी ईप्पर हे २२ सप्टेंबर २०१९ रोजी औरंगाबादला निघाले. ताठे औरंगाबादला पोहोचल्यावर त्याने घडलेला प्रकार खेडकर यांना सांगितला. ताठेला नियुक्तीपत्र दिल्यानंतर कोकाटेने उर्वरीत पैशांची मागणी केली. त्यामुळे त्याच्या बँक खात्यात २१ सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाख रुपये टाकण्यात आले. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे २४ सप्टेंबर २०१९ रोजी नागरेला देखील विमानाने दिल्लीला बोलावून घेतले. त्याची देखील शैक्षणिक कागदपत्रे घेऊन रेल्वे भवनात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला ३० सप्टेंबर २०१९ रोजी रेल्वेमध्ये  नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याच्या नियुक्तीपत्रात ४ नोव्हेंबर २०१९ रोजी नोकरीवर रूजू होण्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर कोकाटेने पुन्हा उर्वरीत पैशांची मागणी केल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ रोजी खेडकर यांनी दीड लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले. तसेच गुगल पेवरुन ५० हजार रुपये पाठवले.

असा झाला भंडाफोड
ताठेने नोकरीवर रूजू होण्याकरिता १० ऑक्टोबर २०१९ रोजी कोकाटेला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की, सध्या मोठे साहेब सुट्टीवर आहेत. तू चार ते पाच दिवसांनी ये. म्हणून ताठेने १५ ऑक्टोबर रोजी विमानाने दिल्ली गाठली. तेथे कोकाटेशी भेट झाल्यावर त्याने मोठे साहेब दौ-यावर आहेत. त्यामुळे थांबावे लागेल असे म्हणत ताठेकडून मुळ नियुक्तीपत्र परत घेतले. त्याचवेळी त्याने नियुक्तीपत्र घेऊन पुढचे काम करतो असे म्हणत ताठेला दिल्लीत दहा ते पंधरा दिवस ताटकळत ठेवले. दिवाळसण असल्याने ताठे पुन्हा औरंगाबादला आला. दिवाळी झाल्यावर नागरेची नियुक्ती होती. त्यामुळे त्याने देखील कोकाटेशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा त्याला ४ नोव्हेंबरला नियुक्ती असली तरी एका महिन्याच्या आत कधीही रूजू होऊ शकता असे सांगितले. त्यामुळे ताठे आणि नागरे एक आठवड्यानंतर दिल्लीला पोहोचले. यावेळी देखील दोघेही दहा ते पंधरा दिवस दिल्लीत थांबले. तेव्हा कोकाटे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने दोघांना त्याच्या उत्तमनगर पुर्व, जनकपुरी, दिल्लीतील फ्लॅटवर थांबवले. दोघेही त्याच्याकडे नियुक्तीपत्र व रूजू होण्याची मागणी करु लागले. परंतू, कोकाटे टाळाटाळ करत होता. आणखी पैशांची मागणी केल्याने त्याला दोन टप्प्यात पुन्हा दोन लाख रुपये देण्यात आले. पुढे दोघेही दिल्लीत आजारी पडले. मात्र, दोघांनाही नोकरीवर रूजू करण्यात आले नाही. म्हणून ते औरंगाबाद परतले. अखेर फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने कोकाटेकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, त्याने पैसे अथवा नोकरीवर रूजू करुन घेतले नाही. त्यावरुन खेडकर यांनी सिडको पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 10:04 pm

Web Title: three people cheated for lakhs over job in railway in aurangabad sgy 87
Next Stories
1 अंबानी प्रकरण: कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाची ‘ती’ व्यक्ती कोण?
2 अंबानी प्रकरण: मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
3 “राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य”
Just Now!
X