दुष्काळाच्या झळा माणसांना बसतात त्या प्राण्यांनाही बसतात हे गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहे. मात्र दुष्काळ काहीही करायला भाग पाडू शकतो अगदी चोरीही याचा प्रत्यय पिंपरीत घडलेल्या घटनेवरून येतो आहे. गावात दुष्काळ असल्याने शेतात पाईप टाकण्यासाठी आरोपीने त्याच्या मित्रांसोबत कट रचून पाईपने भरलेला टेम्पोच पळवला. टेम्पो चालकाला दिघी परीसरात सोडून देण्यात आलं.

याप्रकरणी मुख्य आरोपी संदीप राजेंद्र मोरे सह मित्र अमोल विक्रम मोरे, समाधान त्रिंबक दौंड यांना गुन्हे शाखा एकच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ९०० पाईप आणि टेम्पो असा ११ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संदीप हा चाकण शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव येथे राहण्यास आहे. तो टपरी चालकाचा व्यवसाय करतो. त्याच्या घराच्या समोर अनेक टेम्पो चालक हे गाडी पार्क करून जेवणाकरिता थांबलेले असतात. एकेदिवशी पाईप ने भरलेला टेम्पो पाहून त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढून तो पळवायचा अस संदीप याने ठरवलं. गावाकडे येरमाळा आणि दळवेवाडी (उस्मानाबाद) येथे दुष्काळ पडलेला आहे. पाईपने भरलेला टेम्पो चोरला तर त्यातील काही पाईप शेतात पाईप लाईन करून पाण्याची व्यवस्था करता येईल आणि उरलेले पाईप आणि टेम्पो विकून पैसे मिळतील हा विचार करून मित्रांसोबत कट करून टेम्पो आणि पाईप लंपास करण्याचा कट तिघांनी आखला.

टेम्पो चालक हेरून भास्कर श्रीपती लांडगे याला गेल्या आठवड्यात रात्री पावणेबाराच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर एका दुचाकीवरून हे तिघे जण आले. त्यांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावत आम्ही फायनान्स मधून आहोत टेम्पोचा हप्ता थकलेला आहे असे सांगून चालकाला खाली येण्यास सांगितले. तोपर्यंत एकाने टेम्पो घेऊन धूम ठोकली तर दुसऱ्या दोघांनी चालक लांडगे याला घेऊन जाऊन दिघी येथे सोडले त्याच्याकडील जबरदस्तीने मोबाईल आणि पैसे घेतले. ९०० पाईप आणि टेम्पो असा ऐकून ११ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल उस्मानाबाद येथून गुन्हा शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकाने जप्त केला आहे. आरोपींना पुणे परिसरातून अटक करण्यात आली.