नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत नद्यानाल्यांना पाणी आले आहे. सोमवारी जिल्ह्यात दोन घटनांमध्ये पुरात तीन जण बुडाले. यातील एकाचा मृतदेह २४ तासानंतर सापडला असून, दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात दोन जण ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत. तालुक्यातील धानोरा मक्ता येथील बंडू बोनडारे आणि जयराम भुजबळ हे मोटारसायकलवरून घरी निघाले होते. गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात दोघेही दुचाकीसह वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी जयराम भुजबळ यांचा मृतदेह सापडला. तर बंडू बोनडारे यांचा शोध घेणे सुरूच आहे.

दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यात २० वर्षीय सोहेल खान हा तरुण पैनगंगेच्या नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सोहेल बुडाला. सोहेलचा अद्यापही शोध लागलेला नाही. नांदेडमधील यंत्रणा कमी पडल्याने शोध मोहिमेसाठी नागपूर येथील व्यवस्थापन दलाच्या एका पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासुन जिल्ह्यात आणि विष्णुपूरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झालाय. त्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. अजुनही पाण्याची आवक सुरु असल्याने विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षानंतर नांदेडकरांवर भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते.