वसमत तालुक्यातील सुकळी येथे शेताच्या चतुसीमेच्या वादानंतर झालेल्या खूनप्रकरणी वसमत जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
सुकळी येथील भीमराव अंभोरे यांनी ४ वर्षांपूर्वी बंडू उत्तम अंभोरे यांची एक एकर जमीन विकत घेतली होती. या शेतात अंभोरे यांनी सोयाबीनचे पीक घेतले. दरम्यान, शेताच्या चतुसीमेत चूक झाल्याने वाद न्यायालयात गेला. या दाव्याचा निकाल भीमराव अंभोरे यांच्या बाजूने लागला असताना गावातील दत्तराव अंभोरे, त्यांचे भाऊ भीमराव अंभोरे व मुलाला जिवे मारण्याची धमकी देत होते. १० ऑक्टोबर २०११ रोजी भीमराव अंभोरे व त्यांचा मुलगा आबासाहेब बलगाडीने गावाकडे निघाले असता गावातील अर्चनाबाई भोसले यांच्या घरासमोर दत्तराव मंचक अंभोरे, घनशाम सुंदर अंभोरे, मंचक बाबाराव अंभोरे, सुदर्शन सुंदर अंभोरे हे चौघे अचानक गाडीवर चढून गाडीतील आबासाहेब अंभोरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. तसेच सुंदर अंभोरे यांनी डोक्यात काठीने मारहाण केली. मंचक अंभोरे यांनी भीमराव अंभोरे यांना दगडाने मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या आबासाहेब अंभोरे यांचा रुग्णालयात उपचार घेताना ११ ऑक्टोबर २०११ रोजी मृत्यू झाला.
भीमराव अंभोरे यांनी या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक एस. जी. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. या प्रकरणात ११ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच डॉ. सतीश स्वामी व डॉ. डाके यांनी दिलेला अहवाल ग्राह्य धरून वसमत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन. आरगडे यांनी आरोपी दत्तराव अंभोरे, घनश्याम अंभोरे व सुदर्शन अंभोरे या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अॅड. श्रीधर पाचिलगे यांनी काम पाहिले.