एकाची प्रकृती चिंताजनक
बोईसर पूर्वेकडील लालोंडे येथे दगडखाणीत मातीचा भाग कोसळल्याने येथे काम करणारे तीन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. या कामगारांची सुटका करण्यात आली. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सेल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लालोंडे येथील गट क्रमांक ५३ मध्ये खदान मालक आत्माराम पाटील यांची दगडखाण आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी खदानीत काम करत असताना येथील मातीचा भाग कोसळल्याने येथे काम करणारे तीन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. कामगारांना उपचारासाठी बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील रघुनाथ पवार (५५) या कामगाराला गंभीर दुखापत झाली. महत्त्वाचे म्हणजे अपघात होऊनही त्याची कोणत्याही प्रकारची माहिती खाण मालकाने पोलिसांना दिली नसल्याचे समोर आले आहे.
लालोंडे भागात महसूल विभागाने बेसुमार खोदकाम करणाऱ्या तीन खदानींना बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही येथील खदानी बेकायदा सुरू आहेत. दगडखाणींवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही तसेच येथील खदानमाफियांना महसूल विभाग पाठिशी घातल असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, लालोंडे येथील झालेल्या अपघाताविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायबाये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची माहिती दिली.
कामगारांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह
नागझरी, लालोंडे, किराट, निहे, गुंदले या भागात खदानीत काम करणाऱ्या कामगारांना कामगार कायद्यानुसार कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. कामगारांना देण्यात येणारे वेतन किमान वेतन कायद्यापेक्षा कमी आहे. काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षतेची उपकरणे दिली जात नाहीत. एकही कामगारांकडे सेफ्टी बुट, हॅलमेट, हातमोजे, मास्क अशी कोणत्याही प्रकारची साधन सुविधा देण्यात येत नाही.
खुलेआम सुरू
लालोंडे येथील धोकादायक दगड खदानी बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करून तहसीलदाराकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु तीन खदानींना कागदावर बंद करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली होती. मात्र प्रत्येक्षात येथील दगडखदानी खुलेआम पणे सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 12:22 am