विदर्भातील सुमारे ८० ऐतिहासिक स्मारके आणि वास्तूंच्या जतन-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या पुरातत्व विभागात सध्या केवळ तीनच कर्मचारी असून अनेक पदे रिक्त आहेत. कायमस्वरूपी राखणदार नसल्याने ही स्मारके असुरक्षित बनली आहेत.
किल्ले, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध असलेल्या विदर्भात दुरुस्ती आणि देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष या स्मारकांच्या मुळावर उठले आहे. अनेक किल्ल्यांची पडझड सुरू आहे. त्यांचे जतन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना आखलेल्या नाहीत. दुसरीकडे पुरातत्व विभागात रिक्त पदे मोठय़ा प्रमाणावर आहेत. या विभागात मध्यंतरीच्या काळात कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने आणि अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली. सरकारकडे पदांचा सुधारित आकृतीबंध सादर करण्यात आला होता. त्यात ३४ पदे मंजूर होती, पण अजूनही बऱ्याच पदांवर नेमणुका झालेल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागात शिपाई, डेटा एन्ट्री ऑपरेटर, राखणदारांची अनेक पदे रिक्त आहेत.
पुरातत्व विभागाच्या नागपूर व अमरावती कार्यालयांमध्ये सारखीच स्थिती असून रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरही ताण आहे. काही कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. स्मारकांपैकी केवळ ५ ठिकाणी कायमस्वरूपी राखणदार असून ७० ठिकाणी रोजंदारीवर कर्मचारी आहेत. किल्ले व स्मारकांची दुर्दशा रोखणे त्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेले आहे. नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाकडे विदर्भातील सुमारे ४० स्मारकांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आहे. काही वर्षांपूर्वी अनेक स्मारकांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाचे कायमस्वरूपी राखणदार कामाला होते, पण त्यातील अनेक जण निवृत्त झाले. सध्या केवळ सिंदखेडराजा, गोंदिया, नगरधन, रामटेक, सावनेर येथेच कायमस्वरूपी राखणदार उरले आहेत. उर्वरित ठिकाणी राखणदार ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विदर्भासाठी एकूण तीन शिपायांची पदे मंजूर असून त्यातील दोन पदे नागपूर विभागात, तर एक पद अमरावती विभागात आहे.
ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे असताना इतिहासाविषयीची अनास्था त्यांच्यासाठी घातक ठरू लागली आहे. अनेक किल्ले हे पर्यटकांच्या मस्तीची ठिकाणे बनली आहेत. स्मारकांचे विद्रुपीकरण केले जात आहे, पण त्याला रोखण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. स्मारकांच्या बाहेर लागलेले इशारा देणारे फलक हे नावापुरते उरले आहेत. कोणावरही कारवाई होत नसल्याने हा ऐतिहासिक वारसा हळूहळू नामशेष होताना दिसत आहे.