राज्यात नाशिक, नंदुरबार व पालघर येथे क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करून आदिवासी समाजातील खेळाडूंना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. या क्रीडा प्रबोधिनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतील अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रच्या कोकण प्रांत विभागामार्फत आयोजित एकलव्य खेलकूद स्पध्रेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कोंकण प्रांत उपाध्यक्ष रमेश ओवळेकर, सामाजिक कार्यकर्त्यां ठमाबाई पवार, अखिल भारतीय खेलकूद प्रमुख मुकुंद द्रविड, कोकण प्रांताचे सचिव विष्णू स्वरुंम, भाजप तालुका अध्यक्ष रमेश मुंडे, कर्जतचे प्रांत दत्तात्रेय भडकवाड, तहसीलदार रवींद्र बाविसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाच्या माध्यमातून मिळालेली शिदोरी ही महत्त्वाची असून त्याचा उपयोग ध्येय साध्य करण्यास होतो, खेळाच्या माध्यमातून आपल्याला जिद्द तसेच शारीरिक तंदुरुस्ती, एकसंधतेची भावना मोठय़ा प्रमाणात मिळते. त्याचा उपयोग पुढे जीवनात यशस्वी होण्यासाठी अथवा एखादे ध्येय गाठण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या स्पध्रेतून उत्कृष्ट असे खेळाडू निर्माण होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. आदिवासींमध्ये खेळाचा गुण उपजत असल्याने या क्षेत्रात आदिवासी बांधव मोठी झेप घेऊ शकतात. िलबाराम, कविता राऊत ही त्याची उदाहरणे आहेत असेही ते म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास होऊ शकतो. त्यासाठी राज्यातील २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना त्या त्या भागातील नामवंत शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास विभाग पुढाकार घेईल. यासाठीचे शैक्षणिक शुल्कही विभागामार्फत भरण्यात येईल, असा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले. तसेच इतर शासकीय स्पर्धाप्रमाणे आदिवासी विभागाने घेतलेल्या क्रीडा स्पर्धातील सहभागाबद्दल २५ गुण देण्याचा निर्णयही विभागाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच खेळाडूंनी खेळासोबत अभ्यासालाही महत्त्व देऊन स्पध्रेच्या युगात टिकले पाहिजे असे मत व्यक्त करीत आदिवासी बांधव असलेल्या राज्यातील ७२ तालुक्यांच्या सर्वागीण विकासासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पध्रेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचा व संघांचा मंत्रिमहोदयांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ४२ कि.मी. मॅरेथॉन स्पध्रेचा विजेता पालघरचा धावपटू कृष्णा लक्ष्मण तुंबळा (वेळ ३ तास २५ मिनिटे) तसेच रायगड जिल्ह्य़ाचा २०० मीटर धावणे स्पध्रेचा विजेता मनोज हंबरे आणि जनरल चॅम्पियनशिप विजेता ठरलेल्या पालघर जिल्ह्य़ाच्या संघाचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या आरंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विष्णू स्वरुंम यांनी आपल्या प्रास्ताविकातून या स्पध्रेची माहिती उपस्थितांना दिली. १५ तालुक्यांतील जवळपास ६ हजार ६२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा झाली असून त्यातील विजेते खेळाडू या कोंकण प्रांतस्तरीय स्पध्रेत सहभागी झाले असल्याचे ते म्हणाले. यातील उत्कृष्ट अशा १६० खेळाडूंचा संघ रांची येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्पध्रेसाठी सहभागी होईल अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी विद्यार्थी, पदाधिकारी, शिक्षक, क्रीडा प्रेमी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.