निजामुद्दीन-म्हैसुर सुवर्णजयंती सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान सोमवारी रात्रीच्या सुमारास तीन आरक्षित बोगीत चोरीच्या घटना घडल्या. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. यामध्ये किंमती मोबाईल व रोख रक्कम यांचा समावेश आहे. दरम्यान, धावत्या गाडीत एकाचवेळी तीन बोगीत झालेल्या या घटनांमुळे प्रवाशांत खळबळ उडाली.

मनमाड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरु आहे. रेल्वे प्रवासही आता त्याला अपवाद राहिला नाही. गेल्या काही दिवसांपासून धावत्या रेल्वेत आणि रेल्वे स्थानकातही चोरीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी मनमाड येथील रेल्वेच्या आरक्षण केंद्रातून भरदिवसा १ लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास निजामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेस (गाडी क्र.१२७८२ अप) ही गाडी सोमवारी रात्री भुसावळ स्थानकातून निघाली. रात्री एक ते दीडच्या सुमारास या धावत्या गाडीत तीन वेगवेगळ्या आरक्षित बोगीत प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत सीटवर ठेवलेली लेडीज पर्स आणि बॅग चोरीस गेली. माया रस्तोगी (वय ३६,रा.उत्तरप्रदेश) या एस-१ या बोगीतून प्रवास करीत होत्या. जळगाव जवळ रात्री १.२० च्या सुमारास त्यांची पर्स चोरीस गेली. त्यामध्ये सॅमसंग मोबाईल आणि रोख रक्कम असा २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

दुसऱ्या घटनेत सुरेंद्र चंदेल (वय ३६, रा.दिल्ली) हे याच गाडीच्या एस-७ या आरक्षित बोगीतून प्रवास करत होते. भुसावळ ते माहेंजी दरम्यान त्यांच्याजवळील बॅग चोरीस गेली. त्यात दोन मोबाईल, रोख ९ हजार रुपये असा २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. तर तिसऱ्या घटनेत याच गाडीच्या एस-४ या आरक्षित बोगीतून प्रवास करणाऱ्या रेखा पारेवाल (रा.ऋषिकेश, उत्तराखंड) यांची पर्स भुसावळ ते चाळीसगाव दरम्यान चोरीस गेली. यामध्ये रोख रक्कम आणि मोबाईल असा १० हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. या तिनही घटनांमध्ये सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही गाडी मध्यरात्री मनमाड स्थानकात आल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. तिन्ही प्रवाशांनी  लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे.