नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी राज्यात प्रथमच राबविलेल्या उपाहारगृहाच्या संकल्पनेस यश मिळाल्याने  वन विभागाने आता या उपाहारगृहांची मालिकाच सुरू करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्य़ात आणखी तीन ठिकाणी यासाठी तयारी सुरू केली आहे. हरसूल तालुक्यातील पहिल्या उपाहारगृहामुळे आधी सात ते आठ इतकी असणारी गिधाडांची संख्या सरासरी ३० ते ३५ वर पोहोचली असून, त्यांच्या घरटय़ांची संख्याही वाढत आहे. यामुळे अंजनेरी, चांदवड, बोरगड या तीन ठिकाणी त्यांच्यासाठी लवकरच नवीन उपाहारगृहे सुरू करण्यात येणार आहेत.
मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड पक्षी निसर्गात स्वच्छक म्हणून भूमिका बजावतो. निसर्गाच्या अन्नसाखळीतील तो महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. स्थानिक पातळीवर लांब चोचीच्या व पांढऱ्या मानेच्या गिधाडांच्या प्रजाती आढळून येत असल्या तरी त्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अंजनेरी, ब्रह्मगिरी, मुळेगाव, वरसविहीर, चांदवड, हरसूल, केळझर, ओझरखेड आणि पहिने या गावांतील डोंगरकपारींत आणि जंगल परिसरात गिधाडांचे अस्तित्व सर्वेक्षणाद्वारे आढळून आले. लुप्त होण्याच्या स्थितीत असलेली गिधाडांची घरटी तसेच त्यांचा आढळ असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन हरसूल तालुक्यातील मौजे खोरीपाडा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राज्यातील गिधाडांसाठीचे पहिले उपाहारगृह अस्तित्वात आले. या ठिकाणी अर्धा एकर जागेत संरक्षक जाळी बसविण्यात आली.
उपाहारगृहाची निर्मिती झाल्यावर लगेचच ४५ गिधाडांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन विभाग त्याची वैद्यकीय तपासणी करून मेलेले जनावर  स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करते. सात ते १५ दिवसांच्या कालावधीनंतर नियमितपणे भोजनाची व्यवस्था केली जात असल्याने उपरोक्त क्षेत्रात गिधाडांची संख्या अन् घरटीही वाढल्याचे निरीक्षण वन्यजीव संरक्षण विभागाने नोंदविले आहे.
गिधाडांचे आश्रयस्थान असलेल्या इतर महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून तीन ठिकाणी गिधाडांसाठी नवीन उपाहारगृहे सुरू करण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या मुख्यालयास पाठविण्यात आला आहे.
या बाबतची माहिती मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रकाश यांनी दिली. या उपाहारगृहांसाठी प्रत्येकी चार लाख याप्रमाणे एकूण १२ लाख रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.
‘डायक्लोफिनेक’बाबत दक्षता
गिधाडांच्या संख्येत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ‘डायक्लोफिनेक’ औषधाचे अंश असणाऱ्या प्राण्याच्या मांसाचे भक्षण. हे औषध पाळीव प्राण्यांना वेदनाशामक म्हणून दिले जाते. उपचारादरम्यान त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास आणि अशा प्राण्याचे मांस भक्षण केल्यास गिधाडाचाही मृत्यू होतो. गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने आता या औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे. यामुळे उपाहारगृहासाठी मृत पाळीव प्राण्याचे मांस नेताना पशू वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत आवश्यक तपासणी आणि डायक्लोफिनेक औषधाची मात्रा नसल्याची खात्री केली जाते.