News Flash

अमरावती : अंघोळीसाठी गेलेली तीन मुलं बुडाली, वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही अंत

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रातिनिधीक छायाचित्र

लोकसत्ता खास प्रतिनिधी
अमरावती : धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात बुडून तीन मुले आणि आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. एकादशी निमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करायला गेल्यानंतर ही घटना घडली. यश चवरे (१३), जीवन चवरे(१४), सोहम झेले (१२) पुष्पा चवरे अशी मृत माय लेकरांची नावे आहेत. तर यावेळी बुडणाऱ्या या चौघांना वाचविण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निंभोरा येथील पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पूजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तिन्ही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी नदीपात्रा जवळ उभ्या असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. यामध्ये त्या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निभोंरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्ग जात आहे. या मार्गाच्या कामासाठी नदीत अवैध रित्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, नदीच्या पात्रात पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात बुडून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारावर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 3:34 pm

Web Title: three teenage children and their mother drown in river at amravati scj 81
Next Stories
1 सर्वसामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, तर १५ मंत्र्यांना दिली नाहीत वीजबिलं
2 अणुचाचण्यानंतर अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले, अशा वेळेस… -राज ठाकरे
3 मी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासा
Just Now!
X