राज्यावर दुष्काळाचे सावट असून पावसाळय़ातही राज्यात तीन हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी येथे सांगितले. हवेतून पाणी शोषून घेणाऱ्या ‘आकाशअमृत’ यंत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद परिसरात झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी, तर आमदार अर्जुनराव खोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार अरविंदराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे आणि जिल्हय़ातील वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. लोणीकर म्हणाले, राज्यातील भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत पाणीटंचाईवर १९ योजनांच्या माध्यमातून मात केली जात आहे. पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. २०१४ खरिपातील नुकसानीबद्दल जिल्हय़ातील शेतकऱ्यांना २२३ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, त्यापैकी २१३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. याशिवाय आणखी ७९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असून तो संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे. उद्योगपतींच्या सहकार्याने हवेतून पाणी शोषून घेणारी शंभर यंत्रे राज्यभरात बसविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. खासदार दानवे म्हणाले. ‘आकाशअमृत’ यंत्राचा उपक्रम अभिनव आहे. पाणी ही नेहमी लागणारी बाब असल्याने त्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.
आमदार खोतकर म्हणाले, महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिल्याने जालना जिल्हय़ासह अनेक भागांत खरिपाच्या दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर असून त्यांनी गतिमानतेचा अवलंब करणे जरुरी आहे.