चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे. ते तीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्हय़ातील गोंडपिपरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत.  इतिहास  अभ्यासक नीलेश झाडे यांना शोधमोहिमेदरम्यान शिलावर्तुळे डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले, तर याच मार्गावरील चेक दरूर शेतशिवारात राजेश्वर देशमुख यांच्या शेतात शिलावर्तुळ आढळून आले. वर्तुळासाठी तीन दगडांचा वापर करण्यात आला आहे.

संशोधनाची गरज

नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रियदर्शी खोब्रागडे यांनी या शिलास्तंभाची पाहणी करून ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी याला दुजोरा दिला. परिसरात उत्खनन केल्यास महापाषाण युगातील मानवाची अधिक माहिती जगापुढे येईल. उत्खनन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना  भोटून निवेदन देणार असल्याचे झाडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.