हर्षद कशाळकर

किल्ले रायगडावर जाणाऱ्या महाड ते पाचाडमार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या कामासाठी जवळपास ३ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. या वृक्षतोडीच्या निर्णयाला सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला असून वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी राज्यसरकारने साडेसहाशे कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. यात किल्ले रायगड ते महाड दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचा समावेशही आहे. रस्तारुंदीकरणासाठी जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी भुसंपादन आणि निविदा प्रक्रीया पुर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला आता सुरवात होणार आहे. यासाठी महाड नातेखिंड ते पाचाड जिजाऊ वाड्यापर्यंत जवळपास ३ हजार वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. वृक्षतोडीचे काम सुरु झाले असून वनविभागाने त्यासाठी परवानगी दिली आहे.

आता मात्र सामाजिक संघटनांनी या वृक्षतोडी विरोधात आवाज टाकला आहे. हिरवळ प्रतिष्ठानने या वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरु होण्या आधीच बंद पडण्याची शक्यता आहे. रस्ता रुंदीकरण करतांना जुनी वृक्ष मधोमध ठेऊन रस्त्याचे रुंदीकरण केले जावे अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजेही मागणी करताना हिरवळ प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा दाखला दिला आहे. महाराजांनी वृक्षतोडीस पुर्णपणे मनाई केली असल्याचे या आज्ञापत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे हि वृक्षतोड थांबवावी. वृक्षतोड न करता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

‘महाड ते पाचाड दरम्यान सध्या सात मिटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. तो झाडांची कत्तल न करता ९ मीटर पर्यंत होऊ शकतो. त्यामुळे 3 हजार वृक्षांची कत्तल ठळू शकते, पर्यावरणाचेही रक्षण होऊ शकले. महत्वाची बाब म्हणजे इंदापूर हून रायगडकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरु आहे, तो रस्ताही चांगला झाला तर वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. त्यामुळे या वृक्षतोडीला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे.’

– किशोर धारीया, अध्यक्ष, हिरवळ प्रतिष्ठान

रस्त्याचे काम महामार्ग प्राधिकरण करत आहेत. वृक्षतोड करू नये यासाठी निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. लवकरच याबाबत बठक बोलावली जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ.’

–   निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड.