रुग्णवाहिकेतून प्रवास करीत पुण्याहून सोलापूरकडे येताना मोहोळजवळ लांबोटी येथे थांबलेल्या मालमोटारीवर रुग्णवाहिका आदळल्याने घडलेल्या अपघातात तिघाजणांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे यल्लम्मादेवीच्या यात्रेसाठी हे सर्व प्रवासी येत असताना सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातातील मृत व जखमीपैकी बहुसंख्य पारधी समाजाचे आहेत. मूळचे कर्नाटकातील इंडीचे राहणारे हे सर्वजण पुण्यात उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. रुग्णवाहिकाचालक महेश श्रीरंग उकरंडे (२७, रा. सोलापूर) याच्यासह  कलाबाई सुरेश पवार (५० रा. स्वारगेट, पुणे) आणि महादेप्पा सिद्धप्पा फिरंगे (३५, रा. कसबा पेठ, पुणे) अशी तिघा मृतांची नावे आहेत. दशरथ सुरेश पवार (३५), शारदा दशरथ पवार (३०), त्यांची मुलगी पिपा दशरथ पवार (४), संजना दशरथ पवार (८), येसीबाई सुरेश पवार (१८), मथुराबाई रमेश काळे (४०) व सुरेश गणपत काळे (२५, रा. स्वारगेट, पुणे) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे यल्लम्मादेवीची यात्रा असून पवार व काळे कुटुंबीय यल्लम्मादेवीचे भक्त आहेत. यात्रेनिमित्त हे सर्वजण पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या रिकाम्या रुग्णवाहिकेत बसून मध्यरात्री उशिरा निघाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूरच्या अलीकडे मोहोळजवळ लांबोटी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर सदर रुग्णवाहिका आदळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.