करोना प्रतिबंधक लसीच्या नावाखाली बालकांना द्रव पाजणाऱ्या तीन महिलांना अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे पोलिसांनी अटक केली. या महिलांना अंबड येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तिन्ही महिलांचा जामीन मंजूर करण्यात आला. या तिन्ही महिला मूळच्या बीड जिल्ह्य़ातील आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मुंडे यांच्या फिर्यादीनंतर गोंदी पोलिसांनी या प्रकरणी राधा रामदास सामसे, सीमा कृष्णा आंधळे आणि संगीता राजेंद्र आव्हाड या महिलांना अटक केली.

या तीन महिला साष्ट पिंपळगाव परिसरात पैसे घेऊन करोना प्रतिबंधक लस बालकांना पाजत होत्या. या महिलांबद्दल काही स्थानिक महिलांना संशय आला. लस घेतल्याने करोना त्याचप्रमाणे सर्दी-खोकला होत नाही, असे या महिला ग्रामस्थांना सांगत होत्या. त्यांनी काही बालकांना करोना प्रतिबंधक लसीच्या नावाखाली द्रवही दिले.

साष्ट पिंपळगाव येथील काही नागरिकांनी या संदर्भात शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साष्ट पिंपळगाव येथे भेट दिली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.