नांदेड : रागाच्या भरात आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून करुन त्याचा मृतदेह  गटारात फेकल्याची घटना मालटेकडी भागात शुक्रवारी घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.

शहरातील सांगवी परिसरातील बाबानगर भागात राहुल कोंडिबा गहुबळे हे वास्तव्यास आहेत. ते वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करतात. गुरुवारी कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांची पत्नी कांचन गहुबळे हिने रागाच्या भरात आपला तीन वर्षीय मुलगा दिवेश याचा गळा आवळून खून केला.

आपल्या घरच्या मंडळींना काही माहिती होऊ नये यासाठी तीन वर्षीय चिमुकला दिवेश याचा मृतदेह मालटेकडी भागातील रेल्वे पुलाखाली गटारात टाकून दिले.

या घटनेची माहिती तिचा पती राहुल गहुबळे यास समजताच त्याने विमानतळ पोलिस स्थानक गाठून तक्रार दिली. यावरुन विमानतळ पोलिसांनी आरोपी कांचन गहुबळे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ननवरे हे करीत आहेत.