टाळेबंदीच्या काळात विरार येथे एका बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करताना ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी विरार येथे घडली. विरार पश्चिमच्या बोळींजमधील रानपाडा गावात राहणाऱ्य हेमंत घरत यांनी आपल्या बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते. याच गावात राहणाऱ्या तरुणांनी टाळेबंदीच्या काळात पैसे मिळतील म्हणून हे काम स्वीकारले. मात्र दुपारी काम करत असतांना आतमध्ये विषारी वायुमुळे त्यांचा जीव गुदमरू लागला.
यानंतर त्यांना विरार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे या तिघांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू झाला होता. तर नितेश मुकणे याच्यावर विरार मधील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या बाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 9:40 pm