वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचा अंदाज; वन विभागाचे बछडय़ांच्या निगराणीकडे दुर्लक्ष
ताडोबा बफर झोनमध्ये मृतावस्थेत मिळालेल्या दीड वर्षांच्या वाघाचा मृत्यू भरधाव वाहनाच्या धडकेत झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनात वाघाचा जबडा पूर्णत: तुटला असल्याचे आढळले. २७ डिसेंबरला चार पिलांचा भुकेने व्याकुळ होऊन मृत्यू झाल्यानंतरची घटना आणि पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याने वन विभागाकडून वाघांच्या पिल्लांच्या निगराणीकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. वाघाचा मृतदेह किमान आठ दिवस जंगलात पडून होता.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत महादवारी वनपरिक्षेत्रातील केसलाघाट हनुमान मंदिराजवळील नर्सरीला लागून एका दीड वष्रे वयाच्या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला सायंकाळी उशिरा मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चंद्रपूर-मूल मार्गावर चिचपल्ली वनपरिक्षेत्रातचे जंगलात केसलाघाट हनुमान मंदिराजवळ वन विभागाची नर्सरी आहे. या नर्सरीला लागून कक्ष क्रमांक ३५७ मध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास एका दीड वष्रे वयाच्या वाघाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत वन कर्मचाऱ्यांना दिसून आला. या घटनेची माहिती वन कर्मचाऱ्यांनी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तथा ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने व कार्यालयाला दिली. माहिती मिळताच सायंकाळी उशिरा ताडोबा बफर झोनचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वाघाचे अध्रे शरीर कुजलेले होते. त्यामुळे वाघ नर होता की मादी हे कळू शकले नाही.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांच्याशी संपर्क साधला असता दीड वर्षे वयाच्या वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी छाव्याच्या मृतदेहाचे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवीकांत खोब्रागडे व डॉ. छोनकर यांनी शवविच्छेदन केले असता जबडा पूर्णत: फ्रॅक्चर दिसून आला. तसेच त्याचा मृतदेह रस्त्यापासून १७० मीटर लांबीवर पडून होता. चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव वेगात असलेल्या वाहनाने धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिकाऱ्यांची सारवासारव
वन विभाग वाघ व पिलांची योग्य पध्दतीने निगराणी करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. आता आठ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर वन विभागाचे अधिकारी सारवासारव करण्यात गुंतले आहेत. प्रत्यक्षात निगराणी नसल्यामुळेच या वाघाचा मृत्यू झाला, हे स्पष्ट आहे.