जिप्सीचालकाच्या कृतीने वनखात्यास हादरा; चौकशीचे आदेश, पर्यटक संतप्त 

व्याघ्र कुटुंबाला बघण्याच्या स्पध्रेत एक जिप्सीचालक थेट बछडय़ाच्या अंगावरच जिप्सी नेत असल्याचा धक्कादायक प्रकार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात उघडकीस आला आहे. सुदैवाने या बछडय़ाला कोणतीही दुखापत झाली नाही. जिप्सीचालकाच्या या कृतीमुळे वनखाते हादरले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांनी दिले आहेत. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमींनीही व्यक्त केली आहे.

ताडोबाच्या बफर क्षेत्रातील देवाडा परिसरात वाघ, वाघीण आणि तिच्या तीन बछडय़ांचे हमखास दर्शन होत आहे. या व्याघ्र कुटुंबाला बघण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. मात्र, पर्यटकांच्या या गर्दीत एक जिप्सीचालक थेट बछडय़ाच्या अंगावरच जिप्सी नेत असल्याचा प्रकार राजस्थानच्या रणथंबोर येथून ताडोबा व्याघ्र भ्रमंतीसाठी आलेल्या एका पर्यटकाने निदर्शनास आणून दिला. गेल्या ९ फेब्रुवारीला देवाडा येथील पाणवठय़ावर हे व्याघ्र कुटुंब निवांतपणे बसले होते. त्यांना बघण्यासाठी पर्यटकांच्या जिप्सी अवतीभवती गोळा झाल्या होत्या.

व्याघ्र कुटुंब दिसते म्हटल्यावर ८-१० जिप्सी व खासगी गाडय़ांची गर्दी झाली. याच वेळी झाडे नावाच्या इसमाची एम.एच.३४-एएम-७३७१ क्रमांकाची जिप्सीही आली. यावेळी झाडे पर्यटकाला व्याघ्र कुटुंब दाखविण्याच्या स्पध्रेत जिप्सी थेट बछडय़ाच्या अंगावर घेऊन जात होता. हा सर्व प्रकार बघून पर्यटकांनी आरडाओरडा केली. पर्यटकांनी झाडे यांना खडेबोल सुनावले. या प्रकरणाची तक्रार बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने व ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांच्याकडे करण्यात आल्यावर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

यापूर्वी ताडोबात काम करणाऱ्या प्रशांत काळे या कंत्राटदाराने मोटरसायकलने ताडोबातून जातांना वन्यप्राण्यांसोबत सेल्फी काढून ती समाज माध्यमांवर टाकली होती. हे प्रकरण समोर येताच काळे यांचे काम रद्द करून त्याचा ट्रॅक्टर, मोटरसायकल जप्त करून अडीच हजाराचा दंड ठोठावला होता.

उमरेड-कऱ्हांडला येथेही जिप्सीच्या आजूबाजूला वाघ फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर आला होता. त्या प्रकरणीही चालकावर कारवाई करण्यात आली होती.

कारवाईचे आश्वासन

ताडोबातील गंभीर प्रकाराबाबत क्षेत्र संचालक क्षेत्र संचालक डॉ.गरड यांना विचारले असता, या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या जिप्सीचालकावर कठोर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. जिप्सीचालकच वाघांच्या जिवावर उठल्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.