हिंगोलीत चार गाईंची शिकार

मराठवाडय़ात जवळपास पाच दशकांनंतर वाघाची भ्रमंती होत असून हिंगोली जिल्ह्यतील कलगाव, लिंबी शिवारात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाने आतापर्यंत चार गायींची शिकार केल्याचे वनविभागाचे विभागीय अधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले असून शेतकऱ्यांनी रात्री सावधानता बाळगावी, एकटय़ाने फिरताना सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यातून वाघाने हिंगोली जिल्ह्य़ात शिरकाव केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वनविभागाचे विभागीय अधिकारी केशव बाबळे यांनी सांगितले,की कलगाव, लिंबी, खंडाळा शिवारात वाघाने धुमाकूळ घातल्याचे कळल्यामुळे बुधवारी रात्रीच आम्ही सर्व यंत्रणेला सोबत घेऊन संबंधति भागाचा रात्री व गुरुवारी सकाळीच दौरा केला. जिल्ह्यत प्रथमच वाघाने शिरकाव केला असून त्यांने लिंबी येथील श्रीराम मारुती बेले यांच्या गाईची शिकार केली. प्रत्यक्ष ती कशाने मारली गेली याची खातरजमा करण्यासाठी त्या घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. हे ठसे वाघाचे असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यत वाघाचे आगमन होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे वाबळे यांनी सांगितले.

कलगाव येथील शेतकरी बाबुराव शकुराव पौळ यांच्या तीन गाई शेतात मारून खाल्ल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. वाघाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नांदेडमध्येही दर्शन

मराठवाडय़ातील नांदेड, हिंगोली व विदर्भातील वाशीम, यवतमाळ जिल्ह्य़ात पसरलेल्या पैनगंगा अभयारण्यात पिवळा पट्टेदार वाघ असून त्याने मे महिन्यात नांदेड जिल्ह्य़ातही शिरकाव केला होता. यासंदर्भात वनविभागाच्या सीसीटीव्हीमध्ये वाघ फिरताना कैद झाला होता. अलीकडेच वाघाचे छायाचित्र वनविभागाने माध्यमांसमोर ठेवले होते.