रामटेक तालुक्यातील देवलापारच्या जंगलात गुरुवारी वाघाचा एक बछडा मृतावस्थेत आढळला. मृत बछडय़ाचे शव कुत्र्यांनी अर्धे खाल्ले होते. नागपूर-विदर्भात मागच्या १५ दिवसात विविध कारणांमुळे वाघ, बिबटय़ाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असतानाच पुन्हा वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

वन खात्याचे कर्मचारी पेंच व्याघ्र अभयारण्यातील देवलापार परिक्षेत्रात गस्तीवर असताना त्यांना बछड्याचे शव दिसले. कर्मचाऱ्यांनी लगेच याची माहिती वरिष्ठांना माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून या बछड्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिंचखेड बिटात गेल्या रविवारी सकाळी नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्याचठिकाणी सोमवारी एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. सलग दोन दिवसात दोन वाघांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही वाघांवर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.